नागपूर : नागपुरात भीषण अपघाताची घटना घडला आहे. यात मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. नागपुरात पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असून अपघातात मृत झालेले दोन्ही तरुण अल्पवयीन असल्याची माहिती आहे. तर यातील एक जण गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील पावनगाव ते भरतवाडा वाय पॉईंट रोडवर हा भीषण अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (१२ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असून हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाली असून कार किती भरधाव असेल यांचा अंदाज लागतोय. मिहीर आनंद बेहार, भौमिक अमोल लारोकर आणि सागर संजय मेलवाणी हे तिघे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होते. मिहीर हा वडिलांची कार चालवत होता. मित्र येण्यास वेळ असल्याने तिघेही कारमधून फेरफटका मारत होते. याचवेळी भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात भौमिक लारोकर आणि सागर मेलवाणी यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक मिहीर बेहार जखमी झाला असून त्याच्यावर तारांगण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कळमना पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घाटकोपरमध्ये दरड कोसळली, ६ जणांचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील अशोक नगर परिसरातील गौसिया चाळीवर दरडीचा मोठा भाग कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास, जेव्हा लोक गाढ झोपेत होते, तेव्हाच डोंगराचा कडा थेट गौसिया चाळीतील २ ते ३ घरांवर कोसळला. काही कळण्याच्या आतच डोंगराच्या ढिगार्याखाली लोक दबले गेले.
घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दल, एनडीआरएफ (), स्थानिक पोलीस आणि पालिकेची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. ढिगार्याखाली अडकलेल्या निष्पापांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. मात्र, मागील ९ तासांपासून अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये चिमुकल्याचाही समावेश आहे. सकाळी दोन जणांचे मृतदेह काढण्यात आले. तर, सकाळी १० वाजेपर्यंत आणखी चार जणांचे मृतदेह सापडले. हे एकाच कुटुंबातील सदस्य असण्याची भीती आहे.